सर्वच प्रमुख जलस्रोतांच्या पाणीसाठ्यात कमालीची घट आणि तापमानातील असह्य वाढ यामुळे सारा महाराष्ट्र तहानला असून अनेक शहरे, खेडी आणि वाड्या-वस्त्यांवर टंचाईची स्थिती आहे. मान्सूनपूर्व पावसाने साथ दिली नाही तर ती गंभीर होण्याचा धोका संभवतो. राज्य सरकारला आणखी महिनाभर ही पाण्याची लढाई नेटाने लढावी लागणार, हे स्पष्ट आहे. गेल्या दीड महिन्यापासून उष्णतेच्या झळांनी महाराष्ट्र अक्षरशः होरपळतो आहे. विदर्भाने 45 अंशांचा पारा कधीच ओलांडला होता. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र त्यातून चुकला नाही.